निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील उगांव येथील विष्णुंपत माणिकराव पानगव्हाणे या शेतक-याच्या तयार द्राक्षबागेवर अज्ञात व्यक्तीने घाव घालत नुकसान केल्याची बाब उघडकिस आली आहे ऎन द्राक्ष हंगामाच्या तोंडावर तयार झालेला द्राक्षबाग उद्धवस्त केला आहे. निफाड तालुक्यातील उगांव येथील विष्णुपंत माणिकराव पानगव्हाणे यांनी दोन वर्षापूर्वी शेतमिळकत गट नं १५०/१ यात तीन एकरवर नानसाहेब परपल या काळ्या वाणाच्या द्राक्षबागेची लागवड केली होती. सदर द्राक्षबागेची अँगल ठिबक तार बांबुयासह इतर उभारणी मशागतीसाठी सुमारे दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. द्राक्षबागेची मशागत करुन चालु हंगामात सदर द्राक्षबागेवर विविध रोगप्रतिकारक औषधे ,खते नत्र देऊन लागवडीनंतरचे पहिलेच पीक आले होते. सदर द्राक्षबागेतील सुमारे सत्तर झाडे ही मुळापासुन तोडुन टाकल्याची बाब गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. द्राक्षबागेत नियमित मशागतीला जाणा-या पानगव्हाणे कुटुंबाला द्राक्षघड सुकलेले दिसले. त्यावेळी बारकाईने पाहणी केल्यावर द्राक्षबागेच्या मुळावरच घाव घातल्याचे दिसुन आले. अनपेक्षितरित्या घडलेल्या या घटनेमुळे पानगव्हाणे कुटुंबियांना धक्का बसला. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे.