निफाड – नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकांनंतर निफाडच्या नगराध्यक्ष होण्याचा बहुमान शिवसेनेच्या उमेदवार सौ. रुपाली विक्रम रंधवे यांना मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. या नगराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेमध्ये अर्ज दाखल करण्याची काल (दि. ८)अंतिम मुदत होती. या मुदतीमध्ये सौ रुपाली विक्रम रंधवे या एकमेव उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला असल्याने नगराध्यक्षपद निवडणुकीची आता फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. सौ. रंधवे या शिवसेनेच्या उमेदवार असून युवा सेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांच्या अर्धांगिनी आहेत.
निफाड नगरपंचायत मध्ये १७ पैकी ११ जागांवर शिवसेना आणि शहर विकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. यापैकी १० महिला नगरसेवक विजयी झालेल्या आहेत. निफाड नगरपंचायतीचे अध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव झाल्याने नगराध्यक्ष होण्यासाठी मोठी चुरस निर्माण झालेली होती. निफाड येथील एका नामांकित हॉटेलमध्ये दोन्ही गटांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आलेली होती.
शिवसेनेचे माजी आमदार अनिल पाटील कदम आणि निफाड शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा राजाभाऊ शेलार यांच्यात सत्ता वाटपावरून काहीकाळ रस्सीखेच झाली. मात्र चर्चेअंती राजाभाऊ शेलार यांनी सुचवलेला तोडगा सर्वानुमते मान्य करण्यात आला. त्यानुसार नगराध्यक्षपदाचे महिलांसाठीचे आरक्षण हे अडीच वर्षे कायम राहणार असल्याने विजयी महिला उमेदवारांपैकी ५ महिला उमेदवारांना प्रत्येकी पाच महिन्यांचा कार्यकाळ रोटेशन पद्धतीने देण्याचे निश्चित करण्यात आले, तर उपनगराध्यक्ष म्हणून अनिल पाटील कुंदे यांना पूर्णवेळ संधी देण्याचे धोरण आखण्यात आले आहे.