मुंबई (इंडिया दर्पण डेस्क) – मोठ्या व्यक्तिमत्वांची नावांचा वापर करून आणि पुढे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय असे जोडले की झाला मोठा पुरस्कार तयार. अशा पुरस्कारांचा सध्या देशात सुळसुळाट आहे. अलीकडेच चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने पुरस्कार वाटून एका संस्थेने असाच प्रकार सुरू केला होता. पण कुणाचीही बोलण्याची हिंमत झाली नाही. एका मॉडेलने चक्क पुरस्कार परत करून आवाज उठवला आहे.
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार परत करून मॉडेल निकिता घाग हिने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं. होय! कारण या पुरस्काराचे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यापुढे भारत सरकारचाच पुरस्कार येतो. पण तसे नाही. एका खासगी संस्थेने सुरू केलेला हा पुरस्कार आहे. तो परत करण्याचं धाडस निकिता घाग हिने केलं आहे. महान लोकांच्या नावाचा वापर करून अशाप्रकारचे पुरस्कार सुरू करणाऱ्या संस्थांचा घोटाळा उघडकीस आणणे आवश्यक होते, त्यामुळेच आपण हा पुरस्कार परत केल्याचे निकिताने म्हटले. खरं तर निकिताला हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिचं सर्व स्तरावरून कौतुक झालं होतं. कारण ती एक सामाजिक संस्थाही चालवते. गेल्या नऊ वर्षांपासून पशु सेवा संस्थेच्या माध्यमातून ती कार्य करीत आहे. व्यवसायाने मॉडेल आणि सोबत सामाजिक कार्य अश्या दोन्हींची दखल घेऊन तिला हा पुरस्कार देण्यात आला. पण दादासाहेब फाळके यांच्या नावाने भारत सरकार राष्ट्रीय पुरस्कार देत असते, याबद्दल माझ्यासारख्या नव्या कलावंतांना माहिती नाही. त्यामुळेच आम्ही अश्या बोगस पुरस्कारांना बळी पडतो, अशी भावना निकिताने व्यक्त केली आहे. पुरस्कार हे सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायी असतात. पण या पुरस्कारामागे एक यंत्रणा सक्रीय असल्याचे मला अलीकडेच कळले, त्यामुळे पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला.
आलिया, रणबीरही फसले
आलिया आणि रणबीर यांच्या तुलनेत निकिता घाग हिचा चित्रपटसृष्टीतील अनुभव कमी आहे. त्यामुळे तिने हा पुरस्कार स्वीकारणे आश्चर्याचे नाही. पण आलिया आणि रणबीर हे दोघेही या आमिषाला बळी पडले आणि त्यांनी पुरस्कार स्वीकारला. त्या दोघांनी पुढे येऊन पुरस्कार परत करवा, असे आवाहन निकिताने केले आहे.
कुणीही उठतो पुरस्कार देतो
दादासाहेब फाळके यांच्या नावाने भारत सरकार पुरस्कार देत असते, याचा आम्हाला अभिमान आहे आणि आनंदही आहे. पण पण इतर लोकही या पुरस्काराच्या नावाने दुकान चालवतात, याचं वाईट वाटतं. कुणीही उठतो आणि फाळके यांच्या नावाने पुरस्कार देतो, हे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांनी व्यक्त केली.