नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती करण्याचा आदेश केंद्र सरकारने जारी केला आहे. जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर अनिल चौहान यांच्याकडे सीडीएसची जबाबदारी आली आहे. अनिल चौहान यांना दहशतवादाविरुद्धच्या कारवायांमध्ये निपुणता आहे. बारामुल्लासह जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे लष्करी सल्लागार म्हणूनही चौहान यांनी जबाबदारी सांभाळली आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी..
संरक्षण मंत्रालयाने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे की, निवृत्त लेफ्टनंट जनरल भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम करतील. १८ मे १९६१ रोजी जन्मलेले लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे देशाचे नवे सीडीएस असतील. १९८१ मध्ये ११ व्या गोरखा रायफल्समध्ये त्यांची नियुक्ती झाली.
४० वर्षांची कारकिर्द
सुमारे ४० वर्षांच्या कारकिर्दीत लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी अनेक कमांड, कर्मचारी आणि सहाय्यक नियुक्त्या केल्या आहेत. त्यांना जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील बंडखोरीविरोधी कारवायांचा मोठा अनुभव आहे. तसेच, त्यांना दहशतवाद्यांविरोधातील कारवायांमध्ये निपुणता आहे.
काश्मीरमध्ये जबाबदारी
लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे आयएमए डेहराडून आणि नॅशनल डिफेन्स अकादमी खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी मेजर जनरल पदावर उत्तर कमांडच्या बारामुल्ला सेक्टरमध्ये इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केले आहे. नंतर ईशान्येतील एका कॉर्प्सचे कमांडिंग केले. सप्टेंबर २०१९ पासून पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ बनले. ३१ मे २०२१ रोजी सेवेतून निवृत्त होईपर्यंत ते या पदावर राहिले.
अनेक पदके प्राप्त
लष्करातील शानदार आणि विशिष्ट सेवेसाठी, लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचेही लष्करी सल्लागार राहिले आहेत. चौहान यांनी अंगोलामध्ये संयुक्त राष्ट्र मिशन म्हणूनही काम केले आहे.
New CDS Left General Anil Chauhan Life Journey