नवी दिल्ली – पूर्वीच्या काळी अशी एक म्हण होती की, ‘पावसाने झोडपले आणि नवऱ्याने मारले तर तक्रार कुणाकडे करणार ? म्हणजे नवऱ्याचा मार खाणे ही जणू काही अलिखित नियम होता. परंतु आता जगभरात समानतेचे युग असून भारतात देखील स्त्री पुरुष समानता आहे. त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकीकडे त्यांच्या हक्कांची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात घरगुती हिंसाचारावरील कायद्यांचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. या सर्वेक्षणानुसार, तेलंगणासारख्या राज्यातील 83.8 टक्के महिलांना त्यांच्या पतींनी मारहाण करणे योग्य असल्याचे मानले असून कर्नाटकातील 81.9 टक्के पुरुषांचेही असेच मत आहे.
या राज्यांचा समावेश
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या वतीने कौटुंबिक हिंसाचारावर जम्मू-काश्मीरसह 18 राज्यांतील महिला आणि पुरुषांचे मत घेण्यात आले. या राज्यांमध्ये आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश होता.
हे होते प्रश्न
सर्वेक्षणात महिला आणि पुरुषांचा समावेश करण्यात आला होता. सर्वांना एक समान प्रश्न विचारला गेला की- ‘तुमच्या मते पतीने पत्नीला मारहाण करणे किंवा मारणे योग्य आहे का?’ या सर्वेक्षणात विविध अटींचाही समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये असे लिहिले होते की,
– तुमच्या मते पतीने पत्नीला मारहाण करणे योग्य आहे का आणि केव्हा?
– ती न सांगता घरातून निघून गेली तर?
– तिचे घराकडे दुर्लक्ष झाले की मुलांकडे?
– तिने त्याच्याशी वाद घातला तर?
– तिने त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर?
– ती नीट शिजवत नसेल तर?
– तिने सासरच्या लोकांचा अनादर केला तर?
निष्कर्ष
या सर्वेक्षणात परिणाम अनेकांना आश्चर्यचकित करणारे होते. सन 2019 ते 2021 या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले. त्याचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. यामध्ये तेलंगणातील सर्वाधिक म्हणजे 83.8 टक्के महिलांनी पतीकडून मारहाण करणे योग्य असल्याचे मानले. तर हिमाचल प्रदेशात या प्रश्नावर महिलांची संमती सर्वात कमी होती. येथे केवळ 14.8 टक्के महिलांनी घरगुती हिंसाचाराचे समर्थन केले.
याशिवाय कर्नाटकातील पुरुषांची सर्वाधिक संख्या म्हणजे 81.9 टक्के जणांनी याचे समर्थन केले, तर हिमाचलमधील केवळ 14.2 टक्के पुरुषांनी घरगुती हिंसाचाराचे समर्थन केले. तसेच 2017 मध्ये 52 टक्के महिलांनी घरगुती हिंसाचार न्याय्य म्हणून स्वीकारला 2018 मध्येही अशाच प्रकारच्या सर्वेक्षणाचे निकाल जाहीर करण्यात आले होते. हे सर्वेक्षण 2015 ते 2016 दरम्यान पूर्ण झाले. त्यानुसार 52 टक्के महिलांनी तेव्हा पतीने पत्नीला मारहाण करणे योग्य असल्याचे मानले. तर, केवळ 42 टक्के पुरुषांनी याला सहमती दर्शवली.