अंधांसाठी कार्यरत असलेल्या नॅब संस्थेचे
कोविड काळात कौतुकास्पद काम
गेल्या अडीच ते तीन वर्षात केवळ भारतातच नव्हे तर जगभरात तथा कोरोनाने थैमान घातले होते. या काळात उद्योग, व्यवसाय, शैक्षणिक संस्था सर्व काही बंद होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन ठप्प झाले होते. परंतु जी मुले किंवा व्यक्ती अंध, अपंग, कर्णबधिर, मूक बधिर, दिव्यांग आहेत त्यांना या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. विशेषतः बहुविकलांग म्हणजे वेगवेगळ्या अवयवांमध्ये अपंगत्व आलेली मुले या काळात अनेक संकटांचा सामना करत होती परंतु त्याच वेळी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र नाशिक या संस्थेने अशा मुलांसाठी विविध उपक्रम राबवित त्यांना आणि त्यांच्या पालकांना आणि कुटुंबाला मदतीचा हात दिला अशी माहिती संस्थेचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
सातपूर येथील नॅब संस्थेच्या कार्यशाळेत आयोजित दिव्यांग मुले, पालक संस्थेचे पदाधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी तथा पत्रकार यांच्यासाठी आयोजित संवाद कार्यक्रमात बोलताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र नाशिक या संस्थेद्वारे महाराष्ट्रात कर्णबधिर अंधत्व राज्य केंद्राची स्थापना झाली आहे. त्या अंतर्गत नागपूर, सोलापूर, धुळे अहमदनगर (श्रीरामपूर ) जिल्हा शाखा मध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतात.
बहुविकलांग प्रकल्पाला 2018 पासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे येथून विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता मिळाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, सेन्स इंटरनॅशनल इंडिया अहमदाबाद ज्याला सेन्स इंडिया म्हणून ओळखले जाते, त्यांच्या आर्थिक आणि तांत्रिक साह्याने कर्णबधिर अंधत्व असलेल्या व्यक्ती पर्यंत पोहोचण्याचा एक नवीन आणि अधिक आव्हानात्मक कल्याणकारी कार्य 1999 पासून सुरू करण्यात आले आहे. नाशिक मधील हे युनीट कर्णबधिर अंधत्व युनिट महाराष्ट्रातील कर्णबधिर अंधत्व आणि बहू संवेदना क्षमता असलेल्या मुलांसाठी आणि प्रौढांसाठी काही केंद्रांपैकी एक आहे.
सध्या कर्णबधिर अंधत्व असलेल्या 80 मुलांची काळजी घेतली जात आहे. त्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार त्यांना प्रशिक्षण केले जात आहे. आमची कामगिरी क्षमता आणि हा प्रकल्प हाताळण्यासाठी क्षमता याबद्दल पूर्ण खात्री असल्याने सेन्स इंटरनॅशनल इंडियाने आमच्या नागपूर, सोलापूर, धुळे अहमदनगर (श्रीरामपूर ) जिल्हा शाखेमध्ये असा उपक्रम सुरू करण्याची विनंती केली. या प्रकल्पामुळे या भागात कर्णबधिर अंधत्व असलेल्या व्यक्तींच्या जीवनात बदल घडून आला आहे.
नॅब महाराष्ट्र अंतर्गत कर्णबधिर अंधत्व आणि बहुविकलांग प्रकल्पातील लाभार्थ्यांची एकूण संख्या नाशिक शहर 197 असून धुळे 61, सोलापूर58, श्रीरामपूर (नगर जिल्हा ) 79 , नागपूर शहर 78 असे सर्व मिळून 472 मुले व व्यक्ती आहेत. नॅब संस्थेने आतापर्यंत नाशिक मधील विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांना विविध व्यवसाय सुरू करून दिले आहेत. उदाहरणार्थ साडीचे दुकान, छोटे किराणा दुकान, पिठाची गिरणी आतापर्यंत एकूण 2019 आली 10 मुलांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे व पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेऊन शिक्षण घेत येत आहेत. या मुलांना त्यांच्या दैनंदिन क्रिया करण्यामध्ये आत्मनिर्भर बनविले. या परिसराची हस्तक्षेप केंद्र, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, फिजिओ थेरपी सेंटर, स्पीच थेरपी सेंटर, सेन्सरी रूम समुपदेशन वैद्यकीय तपासणी कार्यात्मक तपासणी अशा विविध सोयी मोफत दिल्या जातात.
विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षण देताना योग शिक्षण, मुर्ती कला, व्यवसाय प्रशिक्षण, पाककला आदी गोष्टींचा समावेश असतो तसेच कर्णबधिर अंध असलेल्या मुले आणि व्यक्तीं वरील कोवीड काळात परिणाम वरील सर्वेक्षण करुन डेटा तयार करण्यात आला. त्यानूसार 65.63 कुटुंबाची कमाई दहा हजार पेक्षा कमी आहे असे दिसून आले. तसेच 67.56 टक्के कुटुंबांनी साथीच्या आजाराच्या वेळी गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे उधार घेतले. 40 टक्के व्यक्ती याकाळात चिंताग्रस्त आणि उदास असल्याचे नोंदविले गेले.
36.29 टक्के व्यक्तीना अपंगत्वा वरची भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळाली नाही. 79.15 टक्के व्यक्तींची पैशांची कमाई धोक्यात आली होती. 50 टक्के विद्यार्थी यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षणात अडचण होती. 50 व्यक्ती या covid-19 मुळे प्रभावित झालेल्याना बहिरेपणा आणि प्रौढ मानसिक आरोग्य समस्या आणि इतर वैद्यकीय समस्या आढळून आल्या. 45.76 टक्के मध्ये दिव्यांगानी नोंदवले कि, महामारी किंवा लॉक डाऊन दरम्यान ते तणाव ग्रस्त होते. 44.64 टक्क्यांपैकी बहुतेकांना भावनिक शोषणाचा सामना करावा लागला. 11.53 टक्के व्यक्तींनी त्यांच्या समस्या पोलिसांना कळवल्या.
नॅब पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, covid-19 च्या परिस्थितीत लॉकडॉऊनमुळे कर्णबधिर अंधत्व आलेल्या व्यक्तींवर झालेले परिणाम नोंदविण्यात आले. त्यात लॉकडॉऊनमुळे शारीरिक हालचालींचा अभाव होता. तसेच काळजीवाहू समर्थनाचा अभाव, ऑनलाईन क्रियाकल्पामुळे संवेदनावर ताण, अधिक एकटेपणा, शोषण आधाराचा अभाव, सुरू असलेले औषध बंद झाले, नियमित आरोग्य तपासणी झाली नाही, उपलब्ध वैद्यकीय उपकरणे यांचा अभाव, संबंधित परिस्थितीमुळे आव्हाने, शारीरिक – भावनिक – आर्थिक असुरक्षितता, मानसिक आरोग्याची समस्या तसेच पालकांनी कुटुंबांच्या सदस्यांवर देखील परिणाम झाला. त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्यासाठी वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नव्हती. संवाद साधण्याकरता डॉक्टरांना संवेदनशील आणि प्रशिक्षित केलेले नव्हते. दैनंदिन कामकाजात मदत करण्यासाठी कोणती उपकरणे उपलब्ध नव्हते.
विशेष म्हणजे covid-19 अशा परिस्थितीत या संस्थेने अशा विद्यार्थी मुले आणि व्यक्तींसाठी मदतीचा हात दिला. या काळात 160 विद्यार्थ्यांना 4 महिने मोफत रेशन वाटप केले. शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कोवीडची परिस्थितीच्या पर्वा न करता विद्यार्थ्यांना घरपोच रेशन पोहोचविले. त्यांच्या घरातील covid-19 काळात चूल बंद पडू दिली नाही. सेन्सिंग यांच्या आर्थिक मदतीमुळे 20 विद्यार्थ्यांना त्यांच्या औषधासाठी 5 हजार प्रमाणे मदत केली. विद्यार्थ्यांना शिक्षणात बाधा होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू केले. तसेच पालक काळात मानसिक तणावातून बाहेर येण्यासाठी समुपदेशन कार्यक्रम आयोजित केले. हे शिक्षक, विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या निरंतर संपर्कात आल्याने पुढील काळातील सावधगिरी व उपायांचे पालकांना सतत मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षित राहू शकले, अशी माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली.
याप्रसंगी अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, महासचिव गोपी मयूर, चेअरपर्सन प्रा.डॉ. सिंधू काकडे, सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका पूजा भालेराव यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केले. तर भारत परदेशी, महेंद्र शेलार, ज्योती पाटील, यांच्यासह अनेक पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमास नॅब संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.