नाशिकच्या महिलेने घडविला हा इतिहास…
मी दीपिका स्वानंद दुसाने (वय वर्ष ३४, रा. इंदिरानगर, नाशिक)
माझे अकरा वर्षांची जुळी मुलं असून माझे मिस्टर बॉस कंपनी नाशिक येथे सर्विस करतात. भारत सरकारने आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत आणि फिट इंडिया या कार्यक्रमांतर्गत भारतातील वेगवेगळ्या शहरातील, वेगवेगळ्या राज्यातील ७५ महिला व पुरुष यांना या आगळ्यावेगळ्या बाईक रॅली या उपक्रमासाठी नेमले होते. त्यात माझी वुमन एम्पॉवरमेंट अंतर्गत निवड करण्यात आली. २१ हजार किलोमीटरचा नाशिक ते दिल्ली त्यानंतर दिल्ली ते संपूर्ण भारत पुन्हा दिल्ली आणि मग पुन्हा नाशिक हा पल्ला मी माझ्या रॉयल एनफिल्ड मीटीयॉर 350 या बाईकवर पूर्ण केला
२ सप्टेंबर रोजी या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात माझी मुलं आणि पती व परिवार यांना नाशिक मध्ये निरोप घेऊन केली. ६ सप्टेंबर रोजी मी दिल्ली येथे पोहोचले. ९ सप्टेंबर रोजी मेजर ध्यानचंद स्टेडियम, दिल्ली येथे भारताचे गृहमंत्री अमित शहांनी हिरवा झेंडा दाखवत आमच्या फ्रीडम मोटो रॅलीला रवाना केले. तिथून चंदीगड, अमृतसर, लेह, लडाख, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पुन्हा दिल्ली असा संपूर्ण भारताचा प्रवास करत २४ नोव्हेंबर रोजी आमच्या प्रवासाची दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये सांगता झाली.
सलग ७५ दिवस संपूर्ण भारत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर बायकर्स हा एक इतिहास रचला गेला. हा प्रवास अतिशय खडतर होता. ऊन, वारा, पाऊस, थंडी आणि प्रचंड गारठा अशा या सर्व प्रकारच्या वातावरणात या सर्व बायकर्सने फिट इंडिया या स्लोगन्सचा जोरदार प्रचार आणि प्रसार केला. भारत सरकारतर्फे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि फिट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या रायडर्सचे प्रत्येक राज्यात जल्लोषाने स्वागत केले जात होते. त्यांचा सत्कार करून त्या त्या प्रदेशातील कल्चरल प्रोग्राम राबविले जात होते.
महाराष्ट्र मधून ९ पुरुष व नाशिक शहरातून एक स्त्री व पुणे शहरातून एक स्त्री यांचा समावेश करण्यात. आणि या सर्व अकरा रायडर्सनी आज संपूर्ण प्रवास पूर्ण ७५ दिवस पार पडला.
यादरम्यान लेह मध्ये आर्मी कॅम्प मध्ये आमच्यातील कोलकता येथील रहिवाशी श्री तरुण विश्वास यांचा हृदयविकाराच्या झटक्याने अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पित करत हा प्रवास असाच पुढे चालू ठेवण्याचा आम्ही सर्व बायकर्सने निर्णय घेतला. आणि त्यांचे हेल्मेट गाडीला बांधून हा संपूर्ण भारताचा प्रवास पूर्ण केला हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली. यादरम्यान एक स्त्री म्हणून दसरा दिवाळी हे सर्व सण आणि छोटी मुलं बाजूला ठेवून ही राईट पूर्ण करत असताना माझ्यातील स्त्री मुलांची आठवण काढत होती. त्यावेळी अश्रूंना वाट मोकळी करून देण्याव्यतिरिक्त कोणताही मार्ग माझ्या पुढे नव्हता. वेळोवेळी मुलांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी गप्पा मारत होते. या सर्व प्रवासात माझ्या पतीने माझी खंबीरपणाने साथ दिली. अर्थातच माझ्या सासू-सासर्यांनी मी नसताना माझ्या मुलांची अतिशय प्रेमाने देखरेख केली.
येणाऱ्या नवीन पिढीसाठी पुष्कळ संधी उपलब्ध असतात. परंतु संधीचा योग्य फायदा उचलता आला पाहिजे. स्वतःवरती आणि स्वतःच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येक स्त्री ही कोणतेही आवाहन पेलण्यास सक्षम असते, याची जाणीव करून देण्यासाठी मी हा केलेला छोटासा प्रयत्न. मला विश्वास आहे की मी माझ्यासारख्या आणखी गृहिणींना सक्षम बनवू शकेल आणि एक आदर्श निर्माण करू शकेल.
जय हिंद जय महाराष्ट्र!!
Nashik Women Bike Rally India Tour
Dipika Dusane Bike Rider Bullate Royal Enfield