नाशिक – परिवहन विभागाच्या वतीने ट्रक चालकांकडून केल्या जात असलेल्या अवास्तव दंड वसुलीबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यात आले असून ट्रकचालकांकडून तात्काळ अवास्तव दंड वसुली थांबवा अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी केली आहे. याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, राज्याचे मुख्य परिवहन आयुक्त, तसेच नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
नाशिक येथे प्रादेशिक परिवहन आयुक्त यांना निवेदन सादर करतांना अध्यक्ष राजेंद्र फड, पी.एम.सैनी,जयपाल शर्मा, विशाल पाठक, सुभाष जांगडा ,अमोल शेळके, सदाशिव पवार ,महेंद्रसिंग राजपूत, संजय राठी,शंकर धनावडे, सिद्धेश्वर साळुंके, अशोक पवार अवि सानप, बापू ताकाटे ,सचिन सानप मनोज उदावंत, नाना पाटील, जगदीश विसपुते देशमुख दादा, हसरत शेख, सोनवणे साहेब, दीपक ढिकले ,दीपक जाधव ,सुनील जंगडा, तेजपाल सोडा ,अनिल कोतकर, विनोद शर्मा ,नंदू पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाची परिस्थिती पूर्व पदावर येत असतांना आता कुठेतरी ट्रान्सपोर्ट व्यवसायाने गती प्राप्त केली आहे. मात्र सद्या रस्त्यावर मालवाहतूक करतांना परिवहन विभागाकडून अवास्तव पणे सुरु असलेल्या दंड वसुलीमुळे ट्रक चालक त्रस्त झाले आहे. परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचा पुरेपूर प्रयत्न ट्रक चालकांकडून माल वाहतूक करतांना केला जातो. मात्र काही व्यावसायिकांकडून अनधिकृतपणे नियमांची पायमल्ली करत माल वाहतूक सुरु आहे. त्याचा सर्व फटका नियमात काम करणाऱ्या चालकांना देखील बसत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, परिवहन विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून सुरु असलेल्या अनधिकृत वसुलीमुळे अनेक व्यावसायिकाना वरदहस्त प्राप्त झाला आहे. त्यामुळे हे व्यावसायिक नियमांची पायमल्ली करत वाहतूक करत आहे. मात्र जे वाहतूकदार नियमानुसार वाहतूक करतात अधिकाऱ्यांना कुठल्याप्रकारे अनधिकृत पणे हफ्ता देत नाही अशा वाहतूकदारांना आपल्या वाहनात किरकोळ स्वरूपात ओव्हरलोड वाहन असेल तर त्यांना आडवून त्यांच्याकडून अवास्तव स्वरूपात दंड वसूल केला जात असल्याचे प्रकार घडत असल्याचे म्हटले आहे.
तसेच परिवहन विभागाकडून किती स्वरूपात माल वाहतूक करायची याची नियमावली घालून देण्यात आलेली आहे. मात्र लांबच्या पल्ल्यावर वाहतूक करत असतांना ट्रकमध्ये डीझेलचा साठा मुबलक प्रमाणात करण्यात येतो. तसेच मालाचे संरक्षण करण्यासाठी उत्तम दर्जाच्या ताडपत्रीचा वापर केला जातो.आणि बॉडी मध्ये तळाचा पत्रा नाजूक असतो तो खुप लवकर खराब होतो त्या साठी पत्र्याची प्लेट किंवा पलायुड टाकावे लागते नियमानुसार घेतलेल्या मालासोबत या साहित्याचा लोड देखील वाहनात येत असतो. त्यामुळे कधीकधी ३०० ते ४०० किलो पेक्षा जास्त वजन अधिक होते. अशा वेळी देखील परिवहन विभागाकडून चालकांवर कारवाई करण्यात येते त्यांना दंड लावण्यात येतो. हा दंड योग्य असेल तर चालक भरतात देखील मात्र सबंधित अधिकाऱ्यांकडून अवास्तव जो भरू शकत नाही असा दंड वसूल करण्यात येत आहे. एकीकडे नियमात वाहतूक करणाऱ्या चालकांना दंड तर दुसरीकडे हफ्ता भरून आपली वाहने सर्रासपणे चालविणाऱ्या वाहतूक दारांवर कुठलीही कारवाई केली जात नाही. याबाबत शासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येऊन अवास्तव व अनधिकृत दंड वसुलीला चाप लावावा अशी मागणी निवेदनाद्वारे अध्यक्ष राजेंद्र नाना फड व वरिष्ठ उपाध्यक्ष, पी.एम.सैनी यांनी केली आहे.