नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-पेठ रोडवरील रामशेज किल्ल्या जवळ एसटी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १ जण ठार झाला असून १५ प्रवासी जखमी झाले आहेत. मृत हा ट्रक चालक आहे. जखमींना नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
नाशिक-पेठ रोडवर रामशेज किल्ल्याजवळील म्हसोबाबारी येथे आज सायंकाळी एसटी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा मोठा होता की यात निम्मी एसटी बसचे नुकसान झाले आहे. तसेच, ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. समोरासमोर झालेल्या या धडकेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. या अपघातात बापू एकनाथ बेडकुळे हा ट्रक चालक ठार झाला आहे. तर, १५ बसप्रवासी जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती तातडीने पोलिस आणि १०८ अॅम्ब्युलन्स यांना देण्यात आली. त्यानंतर तातडीने अॅम्ब्युलन्स मदतीला दाखल झाली. जखमी प्रवाशांना त्वरीत नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपाचारासाठी पाठविण्यात आले. तर, उर्वरीत प्रवाशांना दुसऱ्या एसटी बसने नाशिकमध्ये पाठविण्यात आले. एसटी बसचे चालक आणि वाहक हे सुद्धा जखमी झाले आहेत. हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.