नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरात चक्कर येऊन पडल्याने गर्भवती महिलेसह जुळ्या बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, कुटुंबात तब्बल २१ वर्षांनी पाळणा हलणार होता. पण, एका क्षणातच होत्याचे नव्हते झाले आहे. शहरातील पाथर्डी फाटा येथील या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. पुजा देवेंद्र मोराणकर (वय ४५) असे मृत गर्भवतीचे नाव आहे. फ्लॕट नं. १९, गजानन आर्केड, आनंद नगर, विक्रीकर भुवन जवळ, पाथर्डी फाटा येथे मोराणकर कुटुंबिय राहतात. आज सकाळी पुजा या घरातील कामे करत होत्या. त्यानंतर त्या आंघोळीला गेल्या. बाथरुम मधून बाहेर आल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आले. त्या घरातच कोसळल्या. यावेळी घरात त्यांचे वडील रमेश चिंतामण पाखले आणि बहिण घरात होती. पुजा जमिनीवर कोसळल्याचे पाहून पाखले यांनी तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, पुजा यांच्यासह त्यांच्या गर्भातील जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दुःखद वार्तेने मोराणकर आणि पाखले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
२१ वर्षांनी….
मोराणकर कुटुंबिय हे मूळचे धुळे येथील आहेत. पती देवेंद्र जगन्नाथ मोराणकर हे नोकरीला आहेत. पुजा या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांना जुळे बाळ होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे कुटुंबिय त्यांची खुपच काळजी घेत होते. फारशी हालचाल करु नये, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते. त्यानुसार पुजा या स्वतःची काळजी घेत होत्या. पण, आज काळाने त्यांना घेरले आणि एका क्षणातच संपूर्ण कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे.
वडील आणि बहिणीची भेट
वडील आणि बहिण हे दोन्ही कालच पुजा यांना भेटण्यासाठी नाशिकला आले होते. वडील रमेश पाखले हे गणेशपूर पिंप्री (चाळीसगाव) येथील रहिवासी आहेत. सध्या ते पुण्यात स्थायिक आहेत. कन्या पुजाच्या तब्ब्येतीची चौकशी करण्यासाठीच ते नाशिकला आले होते. आणि त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
गर्भवतीसह जुळे बाळही दगावल्याने ही वार्ता पाथर्डी फाटा परिसरात वेगाने पसरली. आज सायंकाळच्या सुमारास पुजा यांच्या पार्थिवार अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
काळजी महत्त्वाची
एखादी महिला जुळ्या बाळांची गर्भवती असेल तर तिने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांनी जो सल्ला दिला आहे त्याचे तंतोतंत पालन करावे. अनेकदा तज्ज्ञांकडून बेडरेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. त्याचे पालन कसोशीने केले तर अनावस्था प्रसंगाला सामोरे जावे लागत नाही, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
Nashik Pregnant Women Death With Twins Baby