शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनची मागणी मान्य
नाशिक – महापालिका आयुक्तांनी मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक नूतनीकरण व संरक्षक भिंत बांधण्यासाठी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. नंदिनी नदी किनारी संरक्षक भिंत बांधण्यासाठी १ कोटी ६४ लाख ९० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनची मागणी मान्य झाली आहे.
गोविंदनगर येथील स्वर्गीय शिवराम वझरे जॉगिंग ट्रॅकचे तारेचे कंपाउंड तुटले आहे, ग्रीन जिमची मोडतोड झाली आहे, ही दुरावस्था दूर करावी, अशी मागणी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आली होती. नंदिनी नदीच्या संवर्धनासाठी, प्रदूषण रोखण्यासाठी किनार्यावर संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी १६ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आली होती. यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले होते. या दोन्हीही कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवलताई खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे यांच्यासह रहिवाशांनी केली होती. याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना १३ डिसेंबर २०२१ रोजी देण्यात आले होते.
मंगळवार, दि. ८ फेब्रुवारी २०२२ रोजी आयुक्त कैलास जाधव यांनी स्थायी समितीला सन २०२२-२३चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये जॉगिंग ट्रॅकचे नूतनीकरण करणे, संरक्षक भिंत बांधून इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी ७५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. नंदिनी नदीच्या कडेला संरक्षक भिंत बांधण्यासाठी १ कोटी ६४ लाख ८९ हजार १४४ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनची मागणी मान्य झाली आहे. याबद्दल सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्यासह तिडकेनगर, जगतापनगर, कालिका पार्क, कर्मयोगीनगर, गोविंदनगर, काशिकोनगर, सुंदरबन कॉलनी, जुने सिडको, खांडे मळा, बडदेनगर, बाजीरावनगर, खोडे मळा येथील रहिवाशांनी महापालिकेचे आभार मानले आहे.