नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रिकेटसाठी अतिशय आनंदाची बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारची १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. नाशिकच्या अष्टपैलु शाल्मली क्षत्रियची देखील महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय आयोजित, राष्ट्रीय पातळीवरील महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे पुणे येथे हि नियुक्ती घोषित करण्यात आली आहे. १ ते ८ ऑक्टोबर दरम्यान चंदिगड येथे होणार्या स्पर्धेसाठी सदर निवड झाली आहे.
मागील हंगामात ईश्वरी सावकार ची चॅलेंजर ट्रॉफी साठी महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात देखील निवड झालेली होती . तसेच सुरत येथे झालेल्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय आयोजित, राज्यस्तरीय महिला ५० षटकांच्या स्पर्धेत महाराष्ट्र क्रिकेट संघातर्फे सलामीवीर म्हणुन खेळताना ईश्वरी सावकार ने फलंदाजीचे जोरदार प्रदर्शन केले होते . आंध्र विरूद्ध ८६ तर चंदिगड विरूद्ध धडाकेबाज ७३ धावा केल्या. ह्या कामगिरीच्या जोरावरच ईश्वरी सावकारची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघापाठोपाठ १९ वर्षांखालील चॅलेंजर ट्रॉफी साठी देखील निवड झाली होती.
ईश्वरीला हुतात्मा अनंत कान्हेरे मैदाना वरील नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या प्रशिक्षण वर्गात सुरुवातीपासूनच प्रशिक्षक मंगेश शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभत असते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी दोन वेळेस ईश्वरी ची निवड झाली आहे. माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू येथे भारतभरातील उदयोन्मुख , होतकरू खेळाडूंसाठी ऑगस्ट मध्ये महिनाभराचे हे शिबीर झाले .
ईश्वरी सावकारची यापूर्वी मे-जून मधील राजकोट येथे झालेल्या शिबीरासाठी देखील निवड झाली होती. या शिबिरातून बीसीसीआयने सहा संघ तयार केले होते. त्यांच्यात विजयवाडा येथे झालेल्या सामन्यांत ईश्वरीने दोन नाबाद शतके व दोन अर्धशतकांसह सर्वाधिक ५०९ धावा केल्या.
याबरोबरच गेल्या हंगामातील विविध स्पर्धांतील लक्षणीय कामगिरीच्या जोरावर ईश्वरीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे या अतिशय महत्वाच्या हाय परफॉरमन्स शिबिरासाठी म्हणजेच १९ वर्षांखालील वयोगटात संभाव्य निवडक गुणी खेळाडूंना २०२३ साली साऊथ आफ्रिकेत होणार्या पहिल्या विश्वचषकाच्या दृष्टीने तयारी निवड झालेली आहे. आणि आता महाराष्ट्र संघाच्या कर्णधार पदी निवड झाली आहे.
नाशिक जिल्हा क्रिकेट संघ सदस्य अष्टपैलू शाल्मली क्षत्रिय उदयोन्मुख जलदगती गोलंदाज व सलामीवीर आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वेळोवेळी झालेल्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत या केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच आधी महाराष्ट्राच्या संभाव्य संघात व आता अंतिम संघात निवड झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला नाशिक येथे पार पडलेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत शाल्मलीने सर्वोच्च ५७ धावसंख्येसह ३ डावात एकूण ८७ धावा केल्या व अतिशय मोक्याच्या क्षणी दोन महत्वाचे बळी घेत नाशिक संघाला विजयी केले होते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित , चंदिगड येथे १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत – २ ऑक्टोबर केरळ, ४ ऑक्टोबर वडोदरा , ४ ऑक्टोबर – माणिपूर व ८ ऑक्टोबर – हरयाणा.
या निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेटविश्वात आनंदमय वातावरण निर्माण झाले असून, सदरच्या निवडी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे , पदाधिकारी , सदस्य व प्रशिक्षक यांनी ईश्वरी सावकार व शाल्मली क्षात्रियचे अभिनंदन करून भविष्यातील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Nashik Ishwari Sawkar U19 Maharastra Cricket Team Captain