नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायतच्या हद्दीतील भोरवाडी पाड्यावरील एका महिलेला काही व्यक्तींनी भूताळीण ठरवून , पाड्यावर घडलेल्या घटनांना तिलाच जबाबदार धरून तिचे दैनंदिन जगणे मुश्किल करून टाकले. त्याचा राग मनात ठेवून भुताळीन ठरवलेल्या महिलेनेही इतरांना दोष देणे सुरू केले. भुताटकी, मंत्रतंत्र, करणी ,भानामती,जादूटोणा अशा अंधश्रद्धायुक्त, अवैज्ञानिक गोष्टींवर आजही समाजात पारंपरिक समज दृढ असल्याने, या महिलांमध्ये आपापसात मोठ्या प्रमाणात गैरसमज होऊन, सातत्याने भांडणं होऊ लागली. त्यामुळे त्यांना एका ठिकाणी राहणेही मुश्किल झाले.
ही बाब महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक येथील कार्यकर्त्यांना कळाल्यानंतर त्यांनी तातडीने भोरवाडी पाड्यावर भेट देण्याचे ठरवले.त्याप्रमाणे अगोदर घोटी पोलीस स्टेशन येथे जाऊन अंनिसच्या वतीने रीतसर विनंती पत्र पोलीस स्टेशनमध्ये देऊन, संबंधित महिलेला न्याय मिळावा, सर्वांनी एकत्र राहावे यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. तेथील पोलीस अधिकारी दिलीप खेडेकर यांनी तातडीने कार्यकर्त्यांसमवेत त्यांचे एक सहकारी कर्मचारी दिले. त्यांच्यासह कार्यकर्ते भोरवाडी पाड्यावर पोहोचले.
दोन्ही बाजूच्या महिला व पुरुषांना एकत्र आणून त्यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले. केवळ भुताळीन ठरवून त्यातून गैरसमज झाल्याचे स्पष्ट झाले. भुताळीन ठरविलेल्या महिलेला मंत्र, तंत्र, जादूटोणा येत असेल आणि त्यातून जर वाईट घडत असेल , असा जर कोणाचा समज असेल तर तो समज दूर करण्यासाठी, भूताळीण ठरवलेल्या महिलेने केलेला स्वयंपाक कार्यकर्त्यांनी सेवन केला. दोन्ही बाजूकडील व्यक्तींनाही सेवन करण्याचे आवाहन केले. इतरांनीही ते अन्न आणि पाणी घेतले.
त्यानंतर कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धां व त्यांचे निर्मूलन याबद्दलचे शास्त्रीय विवेचन करून, उपस्थितांच्या मनातील अंधश्रद्धांची जळमटं दूर केली. शेवटी ज्या महिलेला भूताळीण ठरवले होते आणि ज्यांनी तिला भूताळीण ठरवले होते, अशा दोन्ही बाजूकडील महिलांना एकत्र आणले. कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार त्यांनी एकमेकींच्या तोंडात साखर भरून ,तोंड गोड केले.यापुढे आम्ही प्रेमाने एकत्र राहू, कुणाला भूताळीण ठरवणार नाही किंवा अंधश्रद्धांच्या माध्यमातून दोष देणार नाही, असे मान्य केले. या मोहिमेत महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे ,नाशिक शहर कार्याध्यक्ष कोमल वर्दे,सचिन महिरे, पोलीस हवालदार बी. आर. जगताप यांनी सहभाग घेतला.
Nashik Igatpuri Crime Anis Superstition