नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरात सध्या धुमधडाक्यात गणेशोत्सव सुरू आहे. बाप्पांना निरोप देताना गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवू द्यावा, अशी मागणी सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलिसांकडे केली होती. मात्र नाशिक पोलीस आयुक्तांनी डीजेच्या वापराची परवानगी नाकारली आहे. तसे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. या निर्णयाविरोधात राज्य सरकारकडे दाद मागण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे.
बाप्पाच्या आगमनच्या पूर्वसंध्येलाच गणेशोत्सवात डीजे वाजवण्यावर पोलिसांनी बंदी घालण्यात आल्याचे परिपत्रक प्रसिद्धीस दिले आहे. या परिपत्रकात गणेश उत्सव साजरा करताना डीजे, साउंड सिस्टिम यांचा वापर करण्यात येऊ नये, तर या ऐवजी पारंपरिक वाद्य वाजवावे. ताेही ध्वनिप्रदूषण हाेणार नाही याची दक्षता घ्यावी असेही परिपत्रकात म्हटले आहे. गणेशाेत्सवात डीजे सिस्टिमला उच्च न्यायालयानेच बंदी घातली आहे. त्यामुळे न्यायालय आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करावी हाेईल, असा इशारा नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिला आहे.
दरम्यान पाेलिस प्रशासनाकडून न्यायालयाचा आदेशा पुढे केला जात असला तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे डीजेला परवानगी मिळण्यासाठी पुन्हा पाठपुरावा करणार असल्याची भूमिका गणेश मंडळांनी घेतल्याने संघर्ष हाेण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
Nashik Ganesh Mandale Police Commissioner Order