नाशिक – औरंगाबाद रोडवर दोन धावत्या बसवर दुचाकीस्वार समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना रविवारी (दि.१२) घडली. या घटनेत दोन्ही वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याने नुकसान झाले असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर हरी आगवन (रा.येवला) या एस.टी. चालकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आगवन हे रविवार सकाळच्या सुमारास येवला नाशिक या बसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली. येवला येथून एमएच १४ बीटी ३२७८ या बसमध्ये प्रवासी भरून ते नाशिकच्या दिशेने रवाना झाले होते. औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल सिग्नलवर त्यांनी आपले वाहन थाबवले असता ही घटना घडली. काळ््या अॅक्टीव्हावर आलेल्या दोघांनी येवला नाशिक बसवर दगडफेक करून नुकसान केले. याचवेळी औरंगाबाद रोडवरील ओढा गावाजवळही असाच प्रकार घडला असून, लासलगाव कडून नाशिकच्या दिशेने जाणाºया एमएच १४ बीटी ४५५६ या बसवर दगडफेक करण्यात आली. या घटनांमध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.