नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खोकला आणि कफ याच्यावर रामबान उपाय म्हणून संबोधली जाणारी औषधी ब्रॅण्डीने प्राध्यापकाचा घात केला. सुपारीचेही व्यसन नसलेल्या व ऐकीव माहितीच्या आधारे केलेला उपाय प्राध्यापकाच्या अंगलट आला आहे. दोन दिवसानंतर झिंग उतरल्याने काही आठवत नसले तरी त्याच्यावर मनस्ताप करण्याची वेळी आली आहे. कोर्ट कचेरी न पाहिलेल्या प्राध्यापकास कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची थेट कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मद्यधुंदावस्थेत बेदरकारपणे कार चालवून तिघांना धडक देणाºया प्राध्यापकाची झिंग दोन दिवसांनंतर उरतली. त्याला मुंबई नाका पोलिसांना अटक करुन न्यायालयात हजर केले. बरेच दिवसांपासून असलेला खोकला आणि कफ जात नसल्याने ऐकीव माहितीनुसार ब्रँडी प्यायलो. त्यात थोडेच पाणी टाकले असा दावा संशयित प्रा. डॉ. साहेबराव निकम याने केला आहे. अख्खी कच्ची क्वार्टर प्यायल्याचे तपासात पुढे येत आहे.
गुरुवारी (दि. १०) सायंकाळी हा प्रकार घडला होता. मद्याच्या नशेत वाहनचालकांना धडक देणाºया संशयित साहेबराव दत्तात्रय निकम (५० रा. म्हसरुळ) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या रक्ताचे नमूने फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. त्याने बेदरकारपणे कार चालवून दिलेल्या धडकेत तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारपासून मद्याच्या नशेत असलेल्या निकमची नशा शनिवारी सकाळी उतरली. यानंतर मुंबई नाका पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून अटक केली. वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहकले यांच्या आदेशान्वये सहाय्यक निरीक्षक साजीद मन्सुरी या प्रकरणी तपास करीत आहेत. संशयितास कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान तिडके कॉलनीतील डायल ११२ व मुंबई नाका पोलिसांचा पाठलाग करतांनाचा थरारक व्हिडीओ शनिवारी समोर आल्याने दिवसभर त्याचीच चर्चा होती.
निकमने काय केलं?
संशयित निकम हा नाशिकरोड येथील वाणिज्य महाविद्यालयात अकाउंट विभागाचा प्रमुख आहे. दुपारी दोनपर्यंत कॉलेजात थांबल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाला. रस्त्यात उपनगर नाक्यालगत एका ठिकाणी कार थांबवून त्याने ब्रँडीची अख्खी क्वार्टर प्यायली. पहिल्यांदाच दारू प्यायल्याचा दावा करत त्याने ब्रँडीत थोडेच पाणी टाकल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्या कारमधील मागील शीटवर शेव पडलेली पंचनाम्यात दिसली. यानंतर घराकडे निघाल्यावर त्याचा एका दुचाकीला कट लागला. हे दुचाकीस्वार त्याचा पाठलाग करु लागल्याने याने कार जोरात पळवली. यानंतरच निकमला काहीही आठवत नसून, थेट रुग्णालयात नशा उतरल्यावर पोलिसचं समोर दिसल्याचे तो सांगतो.
Nashik Crime Rash Driving Professor Investigation Police