नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात आज भरदिवसा अत्यंत भयंकर प्रकार घडला आहे. मद्यधुंद अवस्थेत एका चालकाने भरधाव वेगाने कार चालविली. यावेळी त्याने रस्त्यातील दुचाकी चालक, पादचारी यांच्यासह अनेकांना चिरडले आहे. या गंभीर अपघातामध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागात ७ ते ८ जण जखमी असल्याचे समजते. विशेष म्हणजे यात काही पोलिसांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास एक कारचालक नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर परिसरातून येत होता. तो अतिशय भरधाव वेगाने कार चालवित होता. या कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले. या महामार्गावर त्याने काही वाहनांना धडक दिली. त्यामुळे काही जण जखमी झाले. त्यानंतर या चालकाने वाहन अशोकामार्ग, वडाळागाव मार्गे नाशिक-मुंबई महामार्गावर कार आणली. या मार्गातही त्याने अनेकांना चिरडले आहे. त्यानंतर तो अशाच बेभान वेगात थेट चांडक सर्कल या अत्यंत वर्दळीच्या भागात घुसला.
याचदरम्यान, या कारचे टायरही फुटले. तरीही केवळ हा वाहनचालक वेगानेच वाहन चालवित असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. त्यानंतर चांडक सर्कल परिसरात मोठा जमाव गोळा झाला. या सर्वांनी त्याचे वाहन थांबवित त्याला कारबाहेर काढले. यावेळी तो अत्यंत मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले. काही जणांनी पोलिसांनी संपर्क केला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्याच आले आहे.
सद्यस्थितीत पोलिसांच्या ताब्यात तो असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या थरारात नेमक्या किती व्यक्ती जखमी झाल्या ते स्पष्ट झालेले नाही. नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दोन व्यक्ती दाखल झाल्या आहेत. यातील एका दुचाकी चालकाच्या दोन्ही पायांवरुन कार चालविण्यात आल्याचे पुढे आले आहे. तर, एक व्यक्तीही रक्तबंबाळ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. तसेच, काही व्यक्ती जवळच्या खासगी हॉस्पिटल्समध्ये दाखल झाल्याचे समजते.
Nashik Crime Rash Driving Car So many Peoples Injured