नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार करणाऱ्या नराधमास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने आज शिक्षा सुनावली आहे. संतोष भाऊसाहेब टिळे (२८ रा.पळसे ता.जि.नाशिक) या आरोपीला न्यायालयाने बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरविले. तसेच, न्यायालयाने त्याला २० वर्ष सक्तमजुरी आणि २० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
असा घडला होता गुन्हा
चेहडी पंपीग भागातील १७ वर्षीय मुलीने याप्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोक्सो) आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एप्रिल ते डिसेंबर २०१७ दरम्यान हा गुन्हा टिळे याने केला होता. मुलीच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागल्याने आरोपीने तिचे घर गाठून ब्लॅकमेल करीत पहिल्यांदा तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला होता. घरात कुणी नसल्याची संधी साधत त्याने मुलीस धमकावून हे कृत्य केले होते. यानंतर त्याने पाथर्डीफाटा येथील सेलिब्रेशन हॉटेल, त्र्यंबकरोडवरील वाह नाशिक या लॉजिंगसह पिडीतेच्या घरात वेळोवेळी बलात्कार केला होता.
अश्लिल फोटो व व्हिडिओ काढले
लॉजिंगमध्ये टिळे याने दोघांचे अश्लिल व्हिडीओ आणि फोटो काढले होते. हा व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत तो वारंवार अत्याचार करीत होता. सलग नऊ महिने हा अत्याचार सुरू होता. आरोपीचा त्रास सहन न झाल्याने अखेर मुलीने नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांना यश
या गुन्ह्याचा तपास तत्कालिन निरीक्षक सूरज बिजली यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक ३ च्या न्यायमूर्ती मृदुला भाटिया यांच्या न्यायालयात चालला. सरकार तर्फे अॅड. दीपशिखा भिडे यांनी काम पाहिले. फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेल्या साक्ष आणि सरकार पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस वीस वर्ष सक्तमजूरी आणि २० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
Nashik Crime Rape Molestation Court Sentence Legal Minor Girl