नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वार भामट्यांनी घरासमोर बसलेल्या महिलेच्या गळयातील सुमारे दीड लाख रूपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. ही घटना काठेगल्लीतील तपोवनरोड भागात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिता सुर्यकांत जयस्वाल (रा.देवदत्त रो हाऊस,अनुसयानगर) यानी याबाबत फिर्याद दिली आहे. जयस्वाल रविवारी (दि.१) रात्रीच्या वेळी आपल्या बंगल्यासमोर खुर्ची टाकून बसलेल्या असतांना ही घटना घडली.
दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांपैकी एकाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जयस्वाल यांच्या जवळ जावून त्यांच्या गळय़ातील सुमारे दीड लाख रूपये किमतीची सोनसाखळी हिसकावून दोघानी पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक सविता गवांदे करीत आहेत.