नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- साड्या घेण्यासाठी आलेल्या ग्राहक महिलेने व्यावसायीक महिलेस भुरळ पाडून तिच्या अंगावरील दागिणे लांबविल्याचा प्रकार दिंडोरीरोडवरील सावरकर गार्डन भागात घडला. या घटनेत भामट्या महिलेने सोन्याची पोत व कानातील टॉप्स पळविले असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियंका तुषार शिवदे (रा.मोतीबागनाका मालेगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिवदे यांनी सावरकर गार्डन येथील आकांक्षा अपार्टमेंटमधील आपल्या सदनिकेत साडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. गेल्या २९ मे रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्याकडे एक अनोळखी महिला साड्या खरेदी करण्यासाठी आली होती.
या महिलेने शिवदे यांना बोलण्यात गुंतवून त्यांना भुरळ पाडली. या काळात भामट्या महिलेने शिवदे यांच्या गळयातील सोन्याची पोत व कानातील टॉप्स काढून घेत पोबारा केला. अधिक तपास हवालदार खराटे करीत आहेत.