नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दोन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून टोळक्याने दोन जणांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना वाघाडीतील बुरूडवाडी भागात घडली. या घटनेत कोयत्याने वार करण्यात आल्याने दोघे तरूण जखमी झाले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव जयराम जाधव (१९) अजय सखाराम पवार (२०),दादू डगळे,सागर साळुंके व कृष्णा राजेंद्र जाधव (रा.सर्व वाघाडी,बुरूडवाडी संजयनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे असून त्यातील गौरव जाधव व अजय पवार यांना पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत अनिकेत गणेश नामाडे (१८ रा.ओम किराणा जवळ बुरूडवाडी) या युवकाने फिर्याद दिली आहे.
नामाडे गुरूवारी (दि.२९) रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास मित्र चेतन तुकाराम कांबळे, राजेंद्र हिरामण कांबळे कृष्णा प्रमोद बराटे आदी समवेत बराटे याच्या घरासमोर दुचाकीवर बसून गप्पा मारत असतांना ही घटना घडली. हातात लोखंडी कोयते घेवून आलेल्या संशयित टोळक्याने नामाडे व त्याच्या मित्रांना गाठले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून संशयितांनी बोला आता काय करायचे असे म्हणत हा हल्ला केला.
शिवीगाळ व दमदाटी करीत टोळक्याने चेतन कांबळे याच्यावर वार केले यावेळी नामाडे आपल्या मदतीस धावून गेला असता टोळक्याने त्यालाही लाथाबुक्यांनी मारहाण करीत त्याच्यावरही कोयत्याने वार केले. या घटनेत दोघे मित्र जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक नेमाणे करीत आहेत.