नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात पार्क केलेल्या वाहनातील वस्तू लांबविण्याचे प्रकार वाढले आहेत. वेगवेगळया भागात घडलेल्या घटनांमध्ये सुमारे सव्वा लाख रूपये किमतीचे दोन लॅपटॉप लांबविण्यात आले असून याप्रकरणी आडगाव व पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना तपोवनात घडली. याबाबत अंकित रोहित कुवरा (रा.पौर्णिमा स्विटसच्या मागे,कामटवाडे) यांनी फिर्याद दिली आहे. अंकित कुवरा हे गेल्या शुक्रवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास कुटूंबियासह देवदर्शनासाठी तपोवनातील स्वामी नारायण मंदिरात गेले होते. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमध्ये लावलेल्या कारचे कशाने तरी लॉक उघडून मागील सिटावर ठेवलेली लॅपटॉप बॅग चोरून नेली. या बॅगेत लॅपटॉपसह डेटा कार्ड असा सुमारे ५२ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज होता. अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.
दुसरी घटना गोदाघाटावर घडली. अशोक वाघुले (रा.थेरगाव चिंचवड पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वाघुले गेल्या शनिवारी (दि.२४) ट्रव्हल्सच्या माध्यमातून देवदर्शनासाठी शहरात आले होते. सायंकाळच्या सुमारास ते गोदाघाटावरील वेगवेगळया मंदिरात देवदर्शन घेत असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी रामघाटावरील गोपालदार महाराज समाधी मंदिर परिसरात लावलेल्या ट्रव्हल्सच्या वाहनाचा दरवाजा उघडून कारमधील सुमारे ७० हजार रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शेवाळे करीत आहेत.