नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात तोतया पोलीसांनी पुन्हा धुमाकूळ घातला असून सोमवारी (दि.१७) वेगवेगळया ठिकाणी दोन वृध्द महिलांना गाठून भामट्यांनी अलंकार लांबविले. मदतीचा बहाणा करून दोन्ही घटनांमध्ये सुमारे दीड लाख रूपये किमतीचे दागिणे पळविले असून याप्रकरणी इंदिरानगर व उपनगर पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंजुशा मुकूंद आमडेकर (७४ रा.स्वामी समर्थ केंद्राजवळ,इंदिरानगर) यांनी पहिली फिर्याद दिली आहे. आमडेकर या सोमवारी सकाळच्या सुमारास देवदर्शनासाठी परिसरातील मंदिरात गेल्या होत्या. देवदर्शन घेवून त्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. बापू बंगल्यासमोरील मेडप्लस फार्मसी या दुकानाच्या पायºयांवर त्या विश्रांती साठी बसल्या असता दुचाकीस्वार भामट्यांनी त्यांना गाठले. परिसरात चोर फिरत असल्याची बतावणी करीत भामट्यांनी त्यांना अंगठी व गळयातील सोन्याची पोत काढून ठेवण्याचा सल्ला दिला. यावेळी दुचाकीस्वार भामट्यांनी त्यांना मदतीचा हात देत दागिणे रूमालात बांधून देण्याचा बहाणा करीत सुमारे ८५ हजार रू पये किमतीचे अलंकार हातोहात लांबविले. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.
दुसरा प्रकार जयभवानी रोड भागात घडली. शशिकला पोपटराव पवार (७२ रा.जाचकनगर जयभवानीरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पवार या सोमवारी सकाळी परिसरातील तुळजा भवानी मंदिरातील देवदर्शन आटोपून घराकडे परतत असतांना ही घटना घडली. इच्छामणी पिठाची गिरणी भागातून त्या जयभवानीरोडच्या दिशेने पायी जात असतांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांची वाट अडविली. दागणे काढून ठेवण्याचा सल्ला देत भामट्यांनी मदतीचा बहाणा करून पवार यांचे सुमारे ५१ हजार रूपये किमतीचे दागिणे हातोहात लांबविले. घरी परतल्यानंतर पवार यांनी बॅस्केटमधील कागदाची पुडी खोलून बघितली असता त्यात दगड होता. ही बाब निदर्शनास येताच पवार यांनी पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक बोडके करीत आहेत.