नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तरुणाचे अपहरण करून त्याच्या घरच्यांकडून खंडणी मागणाऱ्या तिघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. तरुणाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत संशयित तिघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी उमेश नवनाथ सरवर (वय १९, रा. पांडुरंग रो हाऊस, हॉटेल एसएसकेसमोर, पाथर्डी शिवार, गौळाणे रोड), विनायक जाधव (वय १८, रा. पोलीस वसाहत, पांडवलेणीच्या पायथ्याशी, आनंदनगर, पाथर्डी फाटा, मूळ रा. मंगरदज खंडाळा, ता. चिखली, जि. बुलढाणा), मुकेश भाऊसाहेब शिंदे (वय २२, रा. ढेमसे गल्ली, शिवाजी चौक, पाथर्डी गाव) यांना पोलीसांनी अटक केली आहे. याशिवाय या संशयितांचे साथीदार कांतीलाल वामजा, मिहीर वामजा, आकाश वानखेडे आणि जयेश सोनवणे यांचा तपास सुरू आहे.
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आनंदा काळे (वय ३५, रा. वरद डी, गणेशा व्हॅली, सिन्नर फाटा, नाशिकरोड) यांचे सात संशयितांनी १९ नोव्हेंबर रोजी अपहरण करून त्याच्या घरच्यांशी संपर्क साधत खंडणीची मागणी केली. या संशयितांनी १९ ते २८ नोव्हेंबरपर्यंत गणेश काळे यांस डांबून ठेवले व सातत्याने खंडणीची मागणी केली. गणेशच्या घरच्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर तपासाची चक्रे सुरु झाली.
पोलिसांनी फोनचा ट्रॅक रेकॉर्ड गोळा करून संशयितांचा माग काढला. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी एसएसके क्लबसमोरील वामजा बांधकाम साईटवर जाऊन गणेशची सुटका केली. संशयित कांतीलाल वामजा व मिहीर वामजा यांनी उमेश नवनाथला सुपारी देऊन गणेश काळेचे अपहरण करून खंडणी मागण्याचे सांगितले. यानुसार संशयितांनी गणेश काळेचे अपहरण करून त्याच्याकडून पैशांची मागणी केली. खंडणी न दिल्यास जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. तसेच वेळोवेळी त्यांनी गणेशला बेल्टने मारहाण, शिवीगाळ करीत डांबून ठेवले होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक फुंदे तपास करीत आहे.