नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बसस्थानकातील गर्दीची संधी साधून प्रवाश्यांच्या रोकड व दागिण्यांवर डल्ला मारणारा श्रीरामपूर येथील भामटा पोलीसांच्या जाळयात अडकला. ठक्कर बाजार बसस्थानकात शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याने दोन बसस्थानक आवारात चोरीचे पाच गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून सुमारे साडे तीन लाख रूपये किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले आहे.
साहिल निसार पठाण (२३ रा.वार्ड नं.२ श्रीरामपूर जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. शहरातील बसस्थानकांमध्ये सध्या गर्दी आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमिवर सर्वच बसस्थानके प्रवाश्यानी फुलल्याने या भागात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. गर्दीची संधी साधत भामटे प्रवाश्यांच्या बॅगेतील रोकडसह महिलांच्या दागिण्यावर डल्ला मारत असल्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. गेल्या काही दिवसात सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील ठक्कर,मेळा व मुंबईनाका हद्दीतील महामार्ग बसस्थानकातील चो-यामा-यावर दस्तरखुद पोलीस आयुक्तानी लक्ष केंद्रीत केल्याने भामटा पोलीसांच्या हाती लागला आहे. युनिट १ चे अंमलदार विशाल काठे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने रविवारी (दि.२७) ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात सापळा लावला असता रेकॉर्ड वरील श्रीरामपूरचा संशयित पोलीसांच्या जाळयात अडकला.
त्याने सरकारवाडा हद्दीतील ठक्कर आणि मेळा बसस्थानक आवारात चार व मुंबई नाका हद्दीतील महामार्ग बसस्थानक आवारात एक चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून साडे तीन लाख रूपये किमतीचे साडे चार तोळे वजनाची सोन्याची लड हस्तगत करण्यात आली आहे. संशयितास जिल्हा व सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्याच्या अटकेने अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णीक,उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहाय्यक आयुक्त संदिप मिटके व युनिटचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर,उपनिरीक्षक रविंद्र बागुल,हवालदार प्रशांत मरकड,विशाल काठे,विशाल देवरे,सुक्राम पवार,शरद सोनवणे,संदिप भांड,प्रविण वाघमारे,प्रदिप म्हसदे,जगेश्वर बोरसे आदींच्या पथकाने केली.