पार्क केलेल्या ट्रकमधून मद्याच्या बाटल्या लंपास
नाशिक – घरासमोर पार्क केलेल्या व दारूने भरलेल्या मालट्रक मधील मद्याच्या बॉक्सवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना पाथर्डी फाटा भागात घडली. या घटनेत पावणे दोन लाख रूपये किमतीची दारू चोरट्यांनी लांबविली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ रामकिसन सातपुते (रा.अंजना लॉन्स मागे,स्वराजनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. सातपुते हे कारखान्यातील मद्य विविध शहरामध्ये पोहचविण्याचे काम करतात. शनिवारी (दि.११) रात्री ते दिंडोरी येथील मॅकडॉल कारखान्यातून मालट्रकमध्ये दारू भरून पाथर्डी फाटा येथील राहत्या ठिकाणी आले होते. पहाटेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याने त्यांनी आपल्या ताब्यातील मालट्रक एमएच १५ जीव्ही ७७६७ राहत असलेल्या सोसायटी समोर पार्क केला असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी दोरी तोडून व ताडपत्री उचकटून ट्रकमधील रम आणि मॅकडॉल नं.१ व्हिस्कीचे सुमारे १ लाख ७६ हजार ६४० रूपये किमतीचे बॉक्स चोरून नेले. अधिक तपास शेख करीत आहेत.
बोधलेनगरला घरफोडीत दीड लाखांचा लंपास
नाशिक – पुणा रोडवरील बोधले नगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी दीड लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात पंधरा हजाराची रोकड,सोन्याचांदीचे दागिणे व साड्यांचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलीमा विनोद नेमाडे (रा.सृष्टी अपा.अशोका टायर दुकानाजवळ,रामदास स्वामी मार्ग) यांनी तक्रार दाखल केली आहे. नेमाडे या रविवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास अल्पावधीच्या कामासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या सेफ्टी डोअरचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले पंधरा हजार रूपयांची रोकड, सोन्याचांदीचे दागिणे आणि साड्या असा सुमारे १ लाख ४९ हजार ६०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक ए.बी.पाटील करीत आहेत.