नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गॅस गिझरमधून वायू गळती झाल्याने एअर इंडिया कंपनीच्या महिला पायलटचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. शहरातील दत्तात्रेय दर्शन कॉलनी परिसरात हा अपघात घडला आहे. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्मी मारूती मुंढे (वय ४८, रा. प्रथमेश रो बंगलो, दत्तात्रेय दर्शन कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे. मुंढे या शनिवारी (५ पेब्रुवारी) आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये आंघोळ करीत होत्या. त्याचवेळी गॅस गिझरमधून वायू गळती झाली. परिणामी त्या बाथरूममध्ये बेशुध्द अवस्थेत पडल्या. कुटुंबियांना ही बाब कळताच त्यांनी तात्काळ रश्मी यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास जमादार गावीत करीत आहेत.