नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तीन वर्षापूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर इगतपुरी शहरात पूर्ववैमनस्यातून पेट्रोलचा पेटता टेंभा (मशाल) अंगावर फेकल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी एकास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कुणाल किशोर हरकरे (वय २८ रा. भजनी मठाजवळ, इगतपुरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत तरुण गंभीर भाजला होता. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला होता.
याप्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी आरोपीस अटक करीत पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. आर. आर. राठी यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे सहाय्यक अभियोक्ता अॅड. योगेश कापसे यांनी काम पाहिले. कोर्टाने फिर्यादी,पंच आणि साक्षीदार यांनी दिलेली साक्ष आणि सरकार पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेले पुराव्यास अनुसरून आरोपीस दोषी ठरवत त्यास जन्मठेप आणि ३५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
खुन्नस काय देतो यावरुन वाद
इगतपुरीतील कोकणी मोहल्ला भागात २३ सप्टेंबर २०१८ रोजी तरुणांमध्ये वाद झाला होता. दीपक खंडू बोरसे आणि प्रशांत उर्फ लखन खंडू बोरसे हे गणेश विसर्जनाची तयारी करत असतांना आरोपी कुणाल हरकरे याने खुन्नस काय देतो, असे म्हणत बोरसे भावंडांशी वाद घातला. स्थानिकांनी हा वाद मिटवल्यानंतर विसर्जन मिरवणूक संपन्न झाली. यानंतर मध्यरात्री बोरसे बंधू आणि सुरेश प्रभूद्याल गुप्ता उर्फ बबली शेठ हे गल्लीत गप्पा मारत होते. यावेळी आरोपी हरकरे याने भांडणाची कुरापत काढून बोरसे बंधूच्या दिशेने पेट्रोलचा पेटता टेंभा फेकला. याघटनेत प्रशांत बोरसे हा गंभीर जखमी झाला होता. मुंबईतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला.