नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी मार्गावरील सेल पेट्रोल पंप परिसरात भरधाव दुधाच्या ट्रकने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना घडली. सुरक्षा रक्षक असलेला पादचारी बुधवारी (दि.७) रात्रपाळीची सेवा बजावण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या साईटवर जात असतांना हा अपघात झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
महेंद्र दशरथ पोटे (४९ रा. मारूती मंदिरावळ बस्ते वस्ती,पाथर्डी गाव) असे अपघातात ठार झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. पोटे हे बांधकाम साईटवर वॉचमनचे काम करीत होते. बुधवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ते कामावर पायी जात असतांना हा अपघात झाला. हॉटेल राजभोग समोर पाथर्डी गावाकडून भरधाव येणा-या एमएच १५ ईजी ९७५३ या दुध गाडीने त्यांना धडक दिली.
पोटे यांच्या अंगावरून पाठीमागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत मुलगा पियूष पोटे याने दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालक बबन खंडू शेणे (४९ रा.लहवित ता.जि.नाशिक) याच्याविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.