नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरासह जिल्ह्यात लाचखोरीची कीड खोलवर पसरली आहे. निफाडची नायब तहसिलदार आणि कोतवाल यांना लाच घेताना काल पकडल्यानंतर आज पोलिस नाईक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) गळाला लागला आहे. सरकारवाडा पोलिस स्टेशनमधील पोलिस नाईक मधुकर दत्तू पालवी (वय ४२ वर्ष) हा ५०० रुपयाची लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
एका व्यक्तीचे चारचाकी वाहनाचे प्रादेशिक परिवहन विभागाचे नोंदणी प्रमाणपत्र (R.C.) गहाळ झाले होते. सदरील नोंदणी प्रमाणपत्र गहाळ झाले बाबत वस्तू गहाळ नोंदवही मध्ये नोंद करून त्याचा दाखला त्या व्यक्तीला आवश्यक होता. त्यासाठी पोलिस नाईक मधुकर पालवी याने ५०० रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि या सापळ्यात पालवी हा सापडला. विशेष म्हणजे, पोलिस आयुक्त कार्यालयापासून सरकारवाडा पोलिस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. आणि तेथेच पोलिस नाईकने लाच घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, एसीबीने आवाहन केले आहे की, लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. त्यासाठी
०२५३- २५७८२३० किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा [email protected] या ई मेलवर तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.
Nashik City Police Bribe Corruption ACB Trap