नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गॅस पाईपलाईनच्या कामामुळे जगतापनगरमध्ये शनिवारी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या प्रयत्नांमुळे ही पाईपलाईन रात्रीतून दुरुस्त करण्यात आली. रहिवाशांनी या तत्परतेबद्दल आभार मानले आहे.
उंटवाडीतील प्रभाग २४ मध्ये जगतापनगर येथे शनिवारी दुपारी एकच्या सुमारास गॅस पाईपलाईनच्या कामामुळे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली, ती तात्पुरती दुरुस्त करण्यात आली. सायंकाळी पाण्याच्या फोर्सने ती पुन्हा फुटली. परिसरात पाणी वाहू लागले. सर्वत्र चिखल झाला. रहिवाशांनी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्याशी संपर्क साधला. घटनास्थळी येवून त्यांनी महापालिका बांधकाम व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना याबाबतची माहिती दिली.
बांधकामचे उपअभियंता हेमंत पठे यांनी गॅस पाईनलाईनचा ठेकेदार, अधिकारी, तसेच महापालिकेच्या संबंधितांना सूचना देवून शनिवारी रात्रीच दुरुस्तीचे काम सुरू केले. रविवारी पहाटे तीन वाजेला दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. यामुळे गैरसोय दूर झाली. प्रयत्न केल्याबद्दल शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचे आणि दखल घेवून त्वरित काम केल्याबद्दल रहिवाशांनी महापालिकेचे आभार मानले आहे.