नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगाबाद रोडवरील निलगिरीबाग भागात बहिणीची छेड काढल्याच्या कारणातून टोळक्याने घरात घुसून कुटुंबियास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या दोघा भावांसह महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी शुभम सुनिल बलसाने (रा.शिवनगर,निलगिरीबाग) यांनी तक्रार दाखल असून आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंटी जगताप, सुरज उर्फ गोट्या पाडोळे, दर्शन खैरनार व ओम भुजाड अशी घरावर हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. बलसाने कुटुंबिय गुरूवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास आपल्या घरात असतांना टोळक्याने अनधिकृतपणे घरात प्रवेश केला. यावेळी जगताप याने तक्रारदाराचा भाऊ केशव बलसाने याने माझ्या बहिणीची छेड का काढली असा जाब विचारत टोळक्याने कुटुंबियांना मारहाण केली. यावेळी आमच्या नादी लागल्यास तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी देत संशयित पाडोळे याने धारदार वस्तूने कुटुंबियांवर हल्ला केला. या घटनेत शुभम बलसाने यांच्यासह पत्नी व भाऊ शरद जखमी झाला असून अधिक तपास हवालदार सावंत करीत आहेत.