नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकलहरे येथील डोंगराजवळ सावकाराच्या जाचाला कंटाळून दोन सख्या भावांनी विषारी औषध सेवन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रवींद्र लक्ष्मण कांबळे (३५) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर जगन्नाथ लक्ष्मण कांबळे (३९) यांच्यावर उपचार सुरु आहे. हे दोन्ही एका खासगी सावकाराकडे पैसे वसुलीसाठी कामाला होते. काही दिवसांपूवी सावकार आणि या दोन भावांमध्ये वाद झाला. त्यानंतर रविवारी सुध्दा वाद झाला. त्यानंतर या दोघा भावांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्यामुळे हे दोघे भाऊ रस्त्याच्या एका बाजूला बेशुद्ध अवस्थेत आढळले. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान रवींद्र कांबळे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर नातेवाईक व त्यांच्या मित्र परिवाराने रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करुन सावकारावर कारवाई करण्याचे मागणी केली. सदर घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.