नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओझर येथील तरूण प्रमोद दत्तू निकाळजे याच्या खूनाचा उलगडा अवघ्या चार दिवसात करण्यात ग्रामीण जिल्हा पोलिसांना यश आले आहे. एकाच महिलेशी दोघांचे प्रेमसंबंध होते त्यावरुन झालेल्या वादातून हा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. १२ जानेवारी रोजी आंबेडकरनगर येथे त्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर आरोपी जयेश देवराम भंडारे, रावसाहेब उर्फ संदीप मधुकर बनसोडे (दोघेही रा. आंबेडकरनगर, ओझर) यांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे.
या खूनाची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मयत प्रमोद निकाळजे व आरोपी जयेश भंडारे या दोघांचे ओझर गावातील एकाच महिलेशी प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. यावरुन दोघांमध्ये वाद झाल्याने आरोपी जयेश भंडारे व त्याचा मित्र संदीप बनसोडे या दोघांनी मिळून प्रमोद निकाळजे याला तलवार व चॉपरने डोक्यावर, तोंडावर व हातांवर वार करुन जीवे ठार मारले. या खूनाच्या तपासात नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी केलेले मार्गदर्शनानुसार अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी-केदार कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळे, अर्चना तोडमल, किशोर अहिरराव, विश्वनाथ धारबळे, दीपक गुंजाळ, अनुपम जाधव, बंडु हेगडे, जितेंद्र बागुल, रमेश चव्हाण, झामरू सूर्यवंशी, प्रसाद सूर्यवंशी, रविंद्र वानखेडे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.