नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर येथे जमिनीच्या वादातून ४४ वर्षीय महिलेने पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुभम संजीव भावसार (रा.काकडे मळा शेजारी अशोकनगर सातपूर ) या युवकाने तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात एका मुंबईस्थीत महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक रामदास भावसार (७२ रा.नगरदेवळा,ता.पाचोरा जळगाव) व रंजना दिनेश कटले (४५ रा.मुंबई) असे महिलेस आत्महत्येस प्रवृ्त करणा-या संशयितांची नावे आहेत. संशयित मृत महिलेचे नातेवाईक असून ते जमिनीच्या वादातून महिलेस त्रास देत असल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. संशयितांच्या जाचास कंटाळून शुभम भावसार यांच्या आई माधूरी संजीव भावसार (४४) यांनी गुरूवारी (दि.१२ ) आपल्या राहत्या घरी बाथरूममध्ये स्व:तास पेटवून घेतले होते. त्यात त्या गंभीर भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. संशयितांनी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.