नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिरावाडीत गैरसमजातून शेजा-यांनी एकास बेदम मारहाण केल्याने एक इसम गंभीर जखमी झाला आहे. या मारहाण प्रकरणी जय गोपिनाथ पाटील (रा.दत्तमंदिराजवळ,त्रिमुर्तीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात तीन जणांविरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नानक गोपीचंद डोणे,अमरजित कौर उर्फ मंजीत टिल्लू अजितपालसिंग ढिल्लो व गुरूचरण प्यारासिंग ढिल्लो अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पाटील दांम्पत्य गेल्या शनिवारी (दि.३१) कामानिमित्त घराबाहेर पडले होते. काम आटोपल्यानंतर पाटील यांच्या पत्नी त्यांच्यासोबत घरी न येता नातेवाईकांकडे गेल्या होत्या. त्यामुळे पाटील घरी येवून आपल्या पत्नीस गल्लीत शिव्या देत असल्याने ही घटना घडली होती. घरासमोर राहणा-या संशयितांनी आपल्यालाच शिवीगाळ करीत असल्याचा गैरसमज करून घेत पाटील यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत गुरूचरण ढिल्लो याने पाटील यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.