नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा शहरात वेगवेगळ्या भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी दीड लाखाचा ऐवज लंपास केला. या घरफोडी प्रकरणी आडगाव आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना रविवार पेठेत घडली. माधवजी गणपत तेजाळे (रा.राजवाडा,रूंग्ठा शाळेमागे) यांनी तक्रार दाखल केली आहे. तेजाळे कुटूंबिय गेल्या सोमवारी (दि.१२) कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ५० हजाराची रोकड चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक नेमाणे करीत आहेत. दुसरी घटना आडगाव शिवारात घडली. येथे राहणारे महेंद्र सुदाम लोखंडे (रा. बालाजी दर्शन अपा.शरयू पार्क,जत्रा हॉटेलजवळ) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, लोखंडे कुटुंबिय बुधवारी (दि.२१) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेली ८० हजाराची रोकड,सोन्याची ठुशी आणि अंगठी असा सुमारे १ लाख १० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.