नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाडेतत्त्वावर दिलेल्या कारची परस्पर विल्हेवाट लावणा-या विरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. अमोल अविनाश जगताप (४२ रा. देवदर्शन अपा.पारिजात नगर जेलरोड ) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी तेजस्वी शिंदे (रा. मंगलमूर्ती नगर कॅनॉल रोड जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. शिंदे यांच्या मालकीची मॅरान्झो कार एमएच १५ एचजी ३६८१ संशयिताने गेल्या मार्च महिन्यात अकरा महिन्याच्या करारावर ताब्यात घेतली होती. सदर कार संशयिताच्या ताब्यात नसल्याने व त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने सशयिताने कारची परस्पर विल्हेवाट लावल्याचा संशय असून त्याने वाहन गहाण अथवा विक्री केल्याचा आरोप मुळमालकाने केला आहे. संशयितास अटक करण्यात आली असून अधिक तपास एपीआय सागर डगळे करीत आहेत.