नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चार महिन्यापासून अमरावती येथे खून करून पसार झालेल्या मुख्य आरोपीला नाशिक रोड पोलिसांनी गजाआड केले आहे. हा आरोपी अमरावती शहरात मामाच्या मुलाची हत्या करून फरार झालेला होता. त्यांच्याविरुध्द अमरावती शहरातील फैजलपुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा आरोपी नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने तपास चक्रे फिरवत या संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कसून चौकशी करताच त्याने त्याच्या गुन्ह्याची कबूल दिली आहे. आता अमरावती फैजलपुरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्याला अमरावती पोलिसांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू आहे.नवनिर्वाचित शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी छोटे मोठे गुंड, सराईत टवाळखोरांवर कारवाई करून त्यांची माहिती संकलित करण्याबाबत सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस पथक काम करत असताना पोलीस उपायुक्त कार्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक विशाल पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती की अमरावती शहरातून खून करून फरार झालेला आरोपी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिन्नर फाटा किंवा रेल्वे स्टेशन भागात संशयित आरोपी असल्याची माहिती मिळताच नाशिक पोलिसांनी तात्काळ शोध सुरू केला होता. सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकाने पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.