नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसापासून घरफोडीचे सत्र सुरु असतांना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चार घरफोडी झाल्याच्या घटना घडल्या. या घरफोडीत १७ लाख २७ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. त्यात रोख रकमेसह सोन्या-चांदीचा ऐवजचा समावेश आहे. घरफोडीची पहिली घटना गंगापूररोडवरील विद्या विकास सर्कल येथील सागर स्वीट्स येथे घडली. या घरफोडीची तक्रार रतन पुनाजी चौधरी (रा. लवाटेनगर, नाशिक) यांनी दिली. चौधरी दुकान बंद करुन रविवारी गेल्यानंतर रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चौधरी यांच्या शॉपमधील ऑफिसच्या मोकळ्या गॅलरीतून दुकानात प्रवेश करुन ही घरफोडी केली. ही घरफोडी करतांना ऑफिसचे लॅचलॉक उचकटवून येथील लाकडी टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली १५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली. या घरफोडी प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.
दुसरी घटना देवळाली कॅम्प येथे घडली. या घरफोडी प्रकरणी गिता उज्वल सिंग (रा. भक्ती ऑरनेट, नवी मुंबई) यांनी दिली. सिंग यांचे देवळाली कॅम्प येथील कासार मळा, बनात चाळ येथे सप्तशृंगी रो हाऊसमध्ये घर आहे. या ठिकाणी २१ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत अज्ञात चोरट्याने या बंद घराच्या दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममध्ये असलेल्या कपाटाचे लॉक उघडून त्यात १ लाख ४१ हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाडवी करीत आहेत.
घरफोडीची तिसरी घटना सातपूर येथे घडला. या घरफोडीची तक्रार सुनिल बाबूराव निगळ (रा. निगळ मळा, सोमेश्वर कॉलनी, सातपूर) यांनी दिली आहे. त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून घरातील कपाटात असलेली ३८ हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन, कानातील टॉप्स व सोन्याची ठुशी तसेच १५ हजार रुपये किंमतीचा एलसीडी टिव्ही असा एकूण ५३ हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. तर चौथी घटना गोरेवाडी येथे घडली. या घरफोडीची तक्रार अनिल महेंद्र शुक्ला (रा. शास्त्रीनगर, गोरेवाडी, नाशिकरोड) यांनी दिली आहे. शुक्ला हे ७ ते १५ डिसेंबर दरम्यान नातेवाईकाकडे लग्नासाठी कुटुंबासह बाहेरगावी गेल्यानंतर चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील हॉल, बेडरूम व घरातच असलेल्या किराणा दुकानातील चांदीचे शिक्के, दागिने, एलसीडी टीव्ही व गल्ल्यातील चिल्लर असा एकूण ३३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.