नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोघा मित्रांनी आपल्या अल्पवयीन बालपणाच्या मैत्रीणीकडेच शरिरसुखाची मागणी केल्याप्रकरणी उपनगगर पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रशांत शिंदे व यश शिंदे (रा.दोघे आगरटाकळी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. मैत्रीत फोनवर झालेल्या संवादाची रेकॉर्डींग आणि छायाचित्र होणा-या पतीस दाखविण्याची धमकी देत ही मागणी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सतरा वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली आहे. पीडिता व संशयित एकमेकांची बालपणाचे मित्र मैत्रीण असून, ते एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. काही महिन्यांपूर्वीच कुटुंबियांनी मुलीचा विवाह नातेवाईक असलेल्या मुलासोबत ठरवून ठेवला. वधू वर विवाह योग्य होताच हा सोहळा पार पडणार आहे. पण, या तरुणीच्या साखरपुड्यानंतर दोघे संशयित मित्र तिच्या पाठीमागे लागले. गेल्या एप्रिल महिन्यापासून संशयितांनी तिला घराबाहेर पडणे मुश्कील केले असून घर परिसरात आणि कॉलेजमध्ये गाठून तिच्याकडे शरिरसुखाची मागणी केली. आमची इच्छा पूर्ण कर नाही तर मैत्रीत फोनवर केलेल्या गप्पा आणि कॉलेज मध्ये काढलेले फोटो नवरदेवास दाखविण्याची धमकी दिली. संशयितांकडून होणारी मागणी आणि त्रास वाढल्याने मुलीने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक सविता उंडे करीत आहेत.