नाशिक : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग करणा-या तरुणास पोलिसांनी गजाआड केले आहे. सरफराज इम्तीयाज शेख (२० रा.काजीपुरा,जुनेनाशिक) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी व्दारका येथील नागजी सिग्नल भागात राहणा-या १७ वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली आहे. मुलीच्या आई वडिलांना आत्महत्येची धमकी देत शिवीगाळ केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार चाकी वाहनातून येणारा संशयित गेल्या काही दिवसांपासून मुलीचा एकतर्फी प्रेमातून पाठलाग करीत होता. माझेशी लग्न कर नाही तर आत्महत्या करीन अशी धमकीही तो देत होता. बुधवारी सायंकाळी मुलगी सह्याद्री हॉस्पिटल परिसरातील महापालिका गार्डन जवळून पायी जात असतांना संशयिताने तिची वाट अडविली. यावेळी पुन्हा त्याने लग्नाची मागणी करीत मुलीचा विनयभंग केला. या घटनेची माहिती मुलीने आपल्या पालकांना दिल्याने आई वडिल घटनास्थळी आले असता संशयितांनी त्यांना आत्महत्या करण्याची धमकी देत शिवीगाळ केली. कुटूंबियांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली असून संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बिडकर करीत आहेत.