काम करत असतांना आठव्या मजल्यावरुन पडल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठरोडवरील आदिवासी कॉलनीत आठव्या मजल्यावर गज फिटींगचे काम करीत असतांना पडल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. रजाऊल हक सुल्तान शेख (२३) असे मृत कामगाराचे नाव आहे. आदिवासी विकास विभागाच्यावतीने या कॉलनीत मुलांना राहण्यासाठी आठ मजली वसतीगृह इमारतीचे बांधकाम सुरू असून, शेख आठव्या मजल्यावर काम करीत असतांना ही घटना घडली. गज फिटींगचे काम करीत असतांना तो अचानक आठव्या मजल्यावरून कोसळला होता. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्यास काका अन्सार आलम यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक लिलके करीत आहेत.
३२ वर्षीय इसमाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३२ वर्षीय इसमाने घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना नाशिक – पुणे मार्गावरील दत्तमंदिर परिसरात घडली. संदिप हेमंत जोशी (३२ रा.क्लासिक अपा.शिवाजीनगर) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. जोशीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जोशी यांनी रविवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये खिडकीच्या गजाला टॉवेल बांधून गळफास लावून घेतला होता. मित्र विरल डांगळे यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात उपचारार्थ हलविले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार बकाल करीत आहेत.