नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडी करून बुलेट पळवून नेणा-या चोरट्यास उपनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. या चोरांकडून घरफोडीतील मुद्देमालासह बुलेट असा सुमारे ५ लाख ४४ हजाराचा ऐवज हस्तगतही करण्यात आला आहे. किरण रतन पाटील (रा.फर्नांडीसवाडी,जयभवानीरोड) असे अटक केलेल्या संशयित चोरट्यांचे नाव असून, तो सराईत गुन्हेगार आहे. पाटील याच्या अटकेने अनेक घरफोड्यांची उकल होण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी वर्तविली आहे.
दसक येथील गणेश कॉलनीत ही घरफोडी झाली होती. याप्रकरणी राहूल डगळे (रा.तिरूपती बंगला,ओमनगर) यांनी तक्रार दाखल केली होती. २ ते ५ नोव्हेंबर दरम्यान डगळे कुटुंबिय बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांचा बंद बंगला फोडून बेडरूममधील कपाटातील १६ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिणे, होम थेअटर आणि घरासमोर पार्क केलेली बुलेट चोरून नेली होती. याबाबत तक्रार दाखल होताच उपनगर पोलिस कामाला लागले होते. वरिष्ठ पातळीवरून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आल्याने पोलिस चोरट्याचा माग काढत असतांनाच खब-याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा लावला असता संशयित पोलिसांच्या जाळयात अडकला. त्याने गुन्हयाची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून घरफोडीच्या मुद्देमालासह चोरीची बुलेट हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई उपनिरीक्षक एम.वाय.गोळे, हवालदार संजय ताजणे पोलिस नाईक विनोद लखन शिपाई राहूल जगताप, सुरज गवळी, पंकज कर्पे आदींच्या पथकाने केली.