नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – किरकोळ विक्रेता असल्याचे भासवून दोन होलसेल व्यावसायीकांना गंडा घालणा-या पोलिसांनी गजाआड केले आहे. मनोज राजाराम गांगुर्डे (२३ मुळ रा.ब्राम्हणवाडे,ता.त्र्यंबक हल्ली स्वामी समर्थ केंद्राजवळ,श्रमिकनगर सातपूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. गांगुर्डे हे वेगवेगळ्या फर्मची नावे सांगून व्यावसायीकांना माल खरेदीची लिस्ट पाठवून पैसे न देताचा किराणा माल खरेदी करत होता. संशयिताच्या अटकेने मुंबईनाका आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. या भामट्याने अनेक व्यापा-यांना गंडविल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून त्याच्या ताब्यातून किराणा मालासह रोकड आणि मोबाईल असा सुमारे १५ हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
गांगुर्डे याने पखालरोड येथील रामबंधू सुपर मार्केट आणि रविवार कारंजा येथील ओम ट्रेंडीग कंपनी या होलसेल व्यावसायीकांनाही गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. भामट्याच्या गुन्हा करण्याच्या पध्दतीचा पोलिस अभ्यास करून त्याच्या मागावर असतांनाच युनिटचे कर्मचारी निलेश पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक औद्योगीक वसाहतीत त्याचा शोध घेत असतांना संशयित श्रमिकनगर येथे मिळून आला. संशयिताने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून ४ हजार ९५५ रूपये किमतीचा किराणा माल, दहा हजाराची रोकड आणि मोबाईल असा सुमारे १४ हजार ९५५ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई उपनिरीक्षक विष्णू उगले,काळू बेंडकुळे,जमादार किरण शिरसाठ हवालदार येवाजी महाले,सुरेश माळोदे,शरद सोनवणे,संदिप भांड,कविश्वर खराटे पोलिस नाईक निलेश पवार,मोतीराम चव्हाण,रावजी मगर,महेश साळुंके,मुक्तार शेख व समाधान पवार आदींच्या पथकाने केली.