देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरांनी केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शांतीनगर परिसरातील बोराडे मळा भागात देवदर्शन आटोपून घराकडे पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीस्वारस्वार चोरांनी लंपास केली. कमल अशोक कहार (५२ रा.अंजनी पार्क रो हाऊस,बोराडे मळा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कहार मंगळवारी सायंकाळच्या सुमारास परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात देवदर्शनासाठी गेल्या होत्या. देवदर्शन आटोपून त्या आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. गणपती मंदिरासमोरून त्या पायी जात असतांना स्कुटीवरून आलेल्या भामट्याने त्यांच्या गळयातील सुमारे २० हजार रूपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.
तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वारांनी हिसकावून नेला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील महाराणा प्रताप चौकात फोनवर बोलत घराकडे पायी जाणा-या तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रफुल्ल हिरामण कन्नोर (१८ रा.महात्मा फुले गार्डन जवळ, राणाप्रताप चौक) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कन्नोर गेल्या गुरूवारी (दि.६) संगणकाच्या शिकवणीसाठी घराबाहेर पडला होता. क्लासवरून घराकडे परतत असतांना असता ही घटना घडली. महाले फार्म भागातून तो फोनवर बोलत घराकडे पायी जात असतांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा केला. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.