प्लॅस्टरचे काम करतांना पहिल्या मजल्यावरून पडल्याने ७० वर्षीय कामगाराचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील म्हाडा कॉलनीत प्लॅस्टरचे काम करतांना पहिल्या मजल्यावरून पडल्याने ७० वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. प्रकाश पंडितराव सुर्यवंशी (रा.म्हाडा कॉलनी,आशिर्वादनगर अंबड) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेत सुर्यवंशी गंभीर जखमी झाले होते. त्यांना बेशुध्द अवस्थेत जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत करण्यात आले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुर्यवंशी हे मंगळवारी (दि.११) परिसरातील साईबाबा मंदिर भागात राहणा-या बालाजी हरतुळे यांच्या घराचे प्लॉस्टरचे काम करीत असतांना ही घटना घडली. पहिल्यामजल्यावर प्लॉस्टर करीत असतांना अचानक पाय घसरल्याने ते जमिनीवर कोसळले होते. या घटनेत नाका तोंडातून रक्त येवून ते बेशुध्द पडल्याने त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारापूर्वी वैद्यकीय सूत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार माळोदे करीत आहेत.
घरात चक्कर येवून पडल्याने २७ वर्षीय युवकाचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंद्रकुंड भागात राहते घरात चक्कर येवून पडल्याने २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. विष्णू नरेंद्र सायखेडे (रा.सात्वीक लॉजजवळ,इंद्रकुंड) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सायखेडे हा तरूण सोमवारी सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अचानक चक्कर येवून पडला होता. या घटनेत त्याच्या डोक्यास मार लागल्याने भाऊ विठ्ठल सायखेडे यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.