नाशिक : नांदूरनाका भागात दोघा मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादात एकास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत युवक जखमी झाला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास रामू यादव (२३ रा.जॅकीनगर,नांदूरनाका) असे आपल्या मित्रास मारहाण करणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी डॉली उर्फ अंकित वसंत म्हस्के (२२ रा.भालेराव मळा,जयभवानी रोड) याने तक्रार दाखल केली आहे. यादव व म्हस्के एकमेकांचे मित्र असून शुक्रवारी (दि.७) दोघे नांदूरनाका येथील जॅकीनगर भागात गप्पा मारत उभे असतांना ही घटना घडली. म्हस्के याने तुझी मैत्रीण दिव्या विरूध्द पोलिसात तक्रार का दाखल केली. याबाबत विचारणा केली असता संतप्त यादवने शिवीगाळ करीत तू माझा नाद सोड, थांब तुझा बेतच पाहतो असे म्हणून जवळ पडलेल्या फावड्याच्या लाकडी दांड्याने त्यास बेदम मारहाण केली. या घटनेत म्हस्के जखमी झाला असून अधिक तपास हवालदार कहांडळ करीत आहेत.