नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमृतधाम परिसरातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टी भागात दुचाकीस कट मारल्याच्या कारणातून दोघांनी अॅटोरिक्षा पेटवून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी रोहित रमेश नाईक (रा.सावित्रीबाई फुले झोपडपट्टी,अमृतधाम) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल तांदळे आणि विजय फसाळे (रा.कोळीवाडा,हिरावाडी) अशी अॅटोरिक्षा पेटवून देणा-या संशयितांची नावे आहे. रिक्षाचालक नाईक सोमवारी रात्री प्रवासी सोडून आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली होती. सायंकाळच्या सुमारास एमएच १५ एफयू ८२६६ या रिक्षाचा कमलनगर बसथांबा भागात संशयितांच्या दुचाकीस धक्का लागला होता. यावेळी नाईक यांनी समजूतदारपणे वादावर पडदा पाडला होता. मात्र या घटनेनंतर नाईक घरी गेले असता संशयितांनी दरवाजा वाजवून सोबत आणलेले बाटलीतील पेट्रोल घरासमोर पार्क केलेल्या रिक्षावर ओतून पेटवून दिली. नाईक यांच्यासह परिसरातील नागरीकांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला असून या घटनेत रिक्षाचे सुमारे पाच हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर संशयित पसार झाले असून अधिक तपास जमादार गायकवाड करीत आहेत.