नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूर रोड भागात मिरचीपुड टाकत दुचाकीस्वारांनी सराफाच्या व्यवस्थापकास लुटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हर्षवर्धन संजीव ओढेकर (रा.तिळभांडेश्वर,सराफ बाजार) यांनी तक्रार दाखल केली आहे. ओढेकर यांचे विद्याविकास सर्कल भागात सराफी पेढी असून रविवारी रात्री व्यवस्थापक विनोद धनजीभाई कटोरिया आणि कामगार विजय प्रभाकर वावरे हे दुकान वाढवून दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. वर्दळीच्या गंगापूररोडने दोघे कर्मचारी सराफ बाजारच्या दिशेने दुचाकीवर प्रवास करीत असतांना दुकानापासून काही अंतरावर असलेल्या शगून हॉटेल परिसरात पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या भामट्यांनी मिरचीपुड फेकत दुचाकीस्वार कामगारांच्या हातातील हॅण्ड बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.या हॅण्डबॅगेत दुकानाच्या चाव्या व महत्वाचे कागदपत्र होते. मात्र कर्मचारींनी प्रसंगावधान राखत वेळीच प्रतिकार केल्याने भामट्यांनी पोबारा केला. ही बाब कर्मचाºयांनी तात्काळ ओढेकर यांना कळविल्याने त्यांनी धाव घेत पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान सरकारवाडा हद्दीत काही दिवसांपूर्वीच चांदी लुटीची घटना घडली होती. संशयित अद्याप हाती लागलेले नसतांनाच पुन्हा ही घटना घडल्याने सराफ व्यावसायीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून लुटारूंचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भोये करीत आहेत.